कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड परिसराचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. याच परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाठीच्या एकछत्र योजनेंतर्गत पावनखिंड मार्गावर विश्रामगृह बांधण्यासाठी तब्बल 14 कोटी 94 लाख 45 हजारांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हा निधी आता जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध होणार असून, लवकरच या विश्रामगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव योजनेंतर्गत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. याकरिता स्थापन केलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कोअर समितीने 4 डिसेंबर 2023 व 6 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रस्तावानुसार निधी वितरणाला मान्यता दिली. यापूर्वीच या प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आता निधीही उपलब्ध होणार असल्याने या विश्रामगृहाच्या कामाला लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे समन्वयक युवराज काकडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं असून पन्हाळा-पावनखिंड मोहिमेसाठी येणाऱ्या शिवप्रेमींना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
शिवराष्ट्र हायकर्सचे प्रशांत साळुंखे यांनी 15 जुलै 2023 रोजी आयोजित केलेल्या शिवमोहिमेत खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी या सर्वांनी दिवसभर पायी चालत या मोहिमेचा आनंद घेतला होता. त्यानंतर येथे आवश्यक असलेल्या सर्व कामांची माहिती घेऊन येथील विकास कामांचा आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली. मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांनी शासन आणि प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत निधी मंजूर करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले.
विकास आराखड्यासाठी निधी मंजूर झाल्याने शिवरायांच्या जाज्वल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा-पावनखिंड मार्गावर मोहिमेसाठी येणाऱ्या शिवप्रेमींची गैरसोय टळणार असून या भागातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या मार्गावर शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाचं प्रतिक असणारा प्रचंड मोठा भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच शिवभक्तांना राहण्यासाठी तीन मोठे हॉल उभारण्यात येणार असून, भक्तांची व विशेषतः महिलांची गैरसोय टाळण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी शौचालयेही बांधण्यात येणार आहेत.
पन्हाळा-पावनखिंड रणसंग्राम
पन्हाळा-पावनखिंड रणसंग्राम म्हणजे अंगावर रोमांच उभा करणारा शिवचरित्रातील महत्त्वाचा रणसंग्राम आहे. शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी भरपावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः 60 किमी अंतरावर असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. धो-धो कोसळणारा पाऊस, त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात तयार झालेली ढिलाई याचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला. पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या एका वाटेने ते 600 मावळ्यांसह बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाहूल सिद्दी जौहरला लागलीच.
सिद्दी जौहरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं दळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशीद या महाराजांसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीस पकडले. मात्र हे खरे महाराज नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला. शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये, यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच. हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारे अस्मानी आणि पाठलाग करणारी सुलतानी संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचं होतं. अखेर सिद्दीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावंच लागलं. पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांचे हिरडस मावळातील आणि इतर सैन्य सिद्दी जौहरच्या सैन्याला रोखण्यासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले. या लढाईत बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं.
पावनखिंड परिसरात दरवर्षी हजारो शिवप्रेमी
पावनखिंड परिसरात दरवर्षी हजारो शिवप्रेमी येत असतात. या परिसरात येणाऱ्या शिवप्रेमी, पर्यटकांसाठी विश्रामगृह उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला सादर केला होता.