कोल्हापूर : लग्न जुळवणाऱ्या एका ऑनलाईन वेबसाईटवर झालेल्या ओळखीतून महिलेचा विश्वास संपादन करून तसेच तिला वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडून १० लाख ९४ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी फिरोज निजाम शेख (रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता घटस्फोटित असून, तिला एक अपत्य आहे. तिने पुन्हा लग्नासाठी स्वतःची माहिती एका वेबसाईटवर टाकली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये संशयित शेख याने तिला संपर्क करून लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर तो पीडितेला भेटण्यासाठी कोल्हापुरात आला होता. स्वतः कंत्राटदार असल्याचे सांगून त्याने तिच्या घरच्यांशी बोलणे केले होते.
सतत फोनवर बोलत असल्याने पीडितेचा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर शेख याने पीडितेला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच याबाबत कोणाला बोलल्यास बदनामी करण्याची धमकी दिली होती. यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने तिच्याकडून २५ हजार रुपये घेतले. डिसेंबर महिन्यात आपल्यावर ‘आयकर’ची रेड पडल्याचे सांगून त्यातून वाचण्यासाठी पैशांची मागणी केली.
पीडितेने स्वतः जवळील ११ तोळे दागिने व रोख १ लाख ६९ हजार रुपये त्याला दिले होते. दागिने व पैसे मिळाल्यानंतर शेख याचे वर्तन बदलले. तो पीडितेशी बोलण्याचे टाळू लागला. त्याने संपर्क कमी केल्याने तिने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडितेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.