माळशिरस: राज्यात सर्व 48 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासून चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील या दोघांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. तसेच माढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. आता या निवडणुकीत बाजी कोण मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीकडून आपल्या विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र, तुतारी समर्थकही आपल्या विजयावर भलतेच ठाम असल्याचे दिसत आहेत . या विश्वासातून अकलूजमधील एका तुतारी समर्थकांने नवी कोरी थार जीपची पैज लावण्याचे आवाहन दिले आहे. तर माढा तालुक्यातील दोन भावांनी चक्क अकरा नव्या बुलेट देण्याची पैज लावली आहे. त्यानंतर हे आव्हान भारतीय जनता पक्षाचे समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारले आहे. तुम्ही जेवढ्या बुलेटची पावती कराल, तेवढ्या बुलेटची मी पावती करायला माझी तयारी असल्याचे आव्हान शहा यांनी पाटील बंधूना दिले आहे. या सर्व प्रकारामुळे रंगत वाढत जाणार आहे. परंतु, निवडणुकीवर सट्टाबाजी करणे कायदेशीर गुन्हा असला, तरी या राजकीय पैजेवरून राजकारण मात्र जोरदार तापत जाणार आहे .
दरम्यान मोहिते-पाटील यांचे समर्थक, माढा तालुक्यातील योगेश पाटील आणि नीलेश पाटील भावंडांना माढा लोकसभेला तुतारीच निवडून येणार, असा आत्मविश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी चक्क भारतीय जनता पक्षासह समर्थकांना 11 बुलेटच्या पैजेचे चॅलेंज दिले आहे. परंतु, हे चॅलेंज भारतीय जनता पक्ष आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या समर्थकांकडून अद्याप स्वीकारले नसून 11 बुलेटची किंमत ३० लाखांहून अधिक होते.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विरोधात असलेले वातावरण आणि शरद पवारांसह मोहिते-पाटलांविषयी निर्माण झालेली सहानुभूती यामुळे माढ्यात मोहिते-पाटील निवडून येतील, असा आत्मविश्वास माढा तालुक्यातील बावी या गावाच्या पाटील बंधूना आहे. आता कोणी भारतीय जनता पक्षाचे समर्थक पुढे आल्यास आणि पैज स्वीकारेल ते दोघेही बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंग करून पैसे भरतील. त्यानंतर जो विजेता होईल, त्याला 11 बुलेट मिळणार आहेत. ही सर्व शर्यत नागरिकांच्या उपस्थितीत एका नोटरीवर रीतसर केली जाणार आहे.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अनुप शहा यांनी चोख उत्तर देत पैजेसाठी तुम्ही जेवढ्या बुलेटच्या पावत्या दाखवाल, तेवढ्या पावत्या करून मी पैज स्वीकारत आहे. माढा लोकसभेतून भाजपचे खासदार रणजित निंबाळकर हेच मोठ्या मताने विजयी होणार असल्याचे शहा यांनी सांगितले आहे. आता पाटील बंधू हे भाजपने दिलेल्या उत्तरानंतर आपल्या पैजेवर कायम राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .