सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने फेर मतदान होणार होते परंतु ते रोखण्यात आलं आहे. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसंच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे.
गावातील आरोपीवर दाखल केले गुन्हे..
1) संजय हरिभाऊ वाघमोडे
2) राजेद्र अंकुश मारकड
3) विजय वाघमोडे
4)वैभव वाघमोडे
5) विलास आद्रट
6) रणजित जिजाबा मारकड
7) लक्ष्मण सिताराम मारकड
(8) सर्जेराव बाबुराव लोखंडे
(9) संदिपान आण्णा मारकड
10) अमित वाघमोडे
11) दत्तु राघु दडस
12) आबा नाना मारकड
13) बबन दादा वाघमोडे
14) मारुती शंकर रणदिवे
15) नानासाहेब मारकड
16) संजय नरळे
17) शरद कोडलकर. सर्व रा. मारकडवाडी.
18) इतर 100 ते 200 लोक
नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप…
दरम्यान, मारकडवाडीतलं मतदान रोखल्यावरुन नाना पटोलेंनी एका पत्रकातून जोरदार टीका केली आहे. “मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया टीका नाना पटोलेंनी दिली आहे.
मारकडवाडी गावात उत्तम जानकरांना कमी मतं मिळाल्याने बॅलेटवर मतदानाची मागणी करण्यात आली. मारकडवाडीचं एकूण मतदान आहे २ हजार ४७६. विधानसभा निवडणुकीत मतदान झालं १ हजार ९०५ यापैकी १००३ मतं पडली राम सातपुतेंना तर ८४३ उत्तम जानकरांना. त्यामुळे गावातील लोकांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली.