कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये तुफान राडा झाला आहे. लहान मुलांच्या वादातून टेम्बलाईवाडी परिसरात तरुणांच्या दोन गटांमध्ये दगडफेक झाली. जमावाकडून परिसरात घुसून दगडफेक करण्यात आली. घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच वाहनांवर देखील हल्ला करण्यात आला. पोलिसांसमोरच हा राडा झाला. या घटनेमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लहान मुलांच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. ताराराणी चौक आणि टेंबलाईवाडी नाका परिसरातील मुले रुक्मिणीनगरच्या शाळेत शिक्षण घेतात. किरकोळ कारणातून या मुलांच्या दोन्ही गटात वाद झाला. त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र तरी देखील याच प्रकरणावरून टेंबलाईवाडी येथील काही तरुण शाळेत पोहोचले. त्यांनी या मुलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यातूनच प्रकरण चिघळले आणि राडा झाला.
संतप्त झालेल्या तब्बल ५० ते ६० जणांच्या टोळक्याने हातात काठ्या-लाठ्या आणि तलवारी घेऊन टेंबलाईवाडी नाका येथील घरांवर हल्ला केला. जमावाकडून परिसरात घुसून जोरदार दगडफेक करण्यात आली. घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच वाहनांवर देखील हल्ला करण्यात आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.