पुणे : आजपासून (दि.3) राज्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांसह, पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसासह मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहेत. तसेच पुणे, सिंधुदुर्ग, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.
राज्यात सध्या मान्सूनचं आगमन झालं नसलं तरीही मान्यूनच्या आगमनासाठीचं पोषक वातावरण मात्र तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागात सोमवारी (3 जून 2024) रोजी वादळी पावसाची हजेरी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या दक्षिणेकडे सापेक्ष आर्द्रता वाढत असल्यामुळे पश्चिमेला असणारा वाऱ्याचा झोत आणखी ताकदीने वाहताना दिसत आहे. दरम्यान केरळात दक्षिण पश्चिमी मोसमी वाऱ्यांमुळे विविध भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे.