पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं आता फेंगल चक्रीवादळात रुपांतर होत आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रती तास इतका असणार आहे. हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत पुढच्या दोन दिवसांनी श्रीलंकेच्या किनाऱ्याला समांतर स्पर्श करत तामिळनाडूच्या दिशेला येणार आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे थंडीचा यलो अलर्ट राज्यात जारी करण्यात आला आहे.
पुणे, लोणावळा, शिरुर भागात तापमान 10 अंशांवर आल्याने हुडहुडी भरली आहे. अनेकजण शेकोट्या पेटवत आहेत. मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये मागील 10 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद बुधवारी करण्यात आली. आज हवेत गारवा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. आज पुन्हा एकदा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फक्त महारष्ट्राचं उत्तर आणि मध्य क्षेत्रच थंडीनं व्यापलं आहे असं नसून, अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या भागांवर धुक्याची चादर असून, सूर्य डोक्यावर आलेला असतानाही हवेतील गारठा मात्र कायम राहणार आहे.