पुणे : देशात ठिकठिकाणी 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये एकूण 13 राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झालीय.
महाराष्ट्रातील (Maharashtra) आठही मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहाने पार पडला. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे जनतेचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत मतदान सुरु आहे. आठ मतदारसंघांत अटीतटीची लढाई सुरु आहे.
महाराष्ट्रात आज सकाळपासून 9 वाजेपर्यंत एकूण 7.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. 19 एप्रिल रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती. 102 जागांवर मतदार करण्यात आलं होते. त्यावेळी 65.5 टक्के मतदानाची नोंद झाली होती. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी सातपासूनच नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. तरुणांसोबतच वयोवृद्ध नागरिक देखील मतदानासाठी उपस्थित असल्याचं दिसतंय.
तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जेवढं जास्त मतदान कराल, तेवढीच आपली लोकशाही मजबूत होईल, अशी पोस्ट त्यांनी आपल्या एक्स हँडलवरुन केली. देशातील स्त्रीशक्तीने मोठ्या प्रमाणात मतदान करावे असेही ते म्हणाले.
अकोल्यामध्येही नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वर – राहुल महादेवराव सोळंके (रा.दहिगाव) याचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले.
अमरावतीमध्येही EVM मशीनमध्ये बिघाड, मतदान 15 मिनिटे थांबलं
अमरावतीच्या वडरपुरा भागातील मतदान केंद्रावर देखील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर येत आहे. सुमारे 15 मिनिटे ही मशीन बंद होती. यानंतर अधिकाऱ्यांनी मशीन सुरू केली.