धारशिव : राज्यातील अनेक भाग आता मान्सूनने व्यापला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. तसेच शेती कामांना वेग आला आहे. अशातच मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. धारशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात वीज पडली. त्यानंतर त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागल्याचे दिसून आले. जमिनीतून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. निळ्या पाण्याच्या प्रवाहाचे व्हिडिओ काढून लोक ते सोशल मीडियावर व्हायरलही करत आहेत.
कसे आले निळे पाणी?
वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागले? या प्रश्नाच उत्तर शोधण्याचं प्रयत्न प्रशासन करत आहे. त्यासाठी भूगर्भ शास्त्रांची सुद्धा मदत घेतली जाणार असल्याचे समजते. धारशिव जिल्ह्यातील या विचित्र घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जायकवाडीत पाण्याची आवाक
मराठवाड्यात दमदार पाऊस सुरु असल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागले आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जायकवाडी धरणात तब्बल 1 टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे.