लाहेरी (गडचिरोली) : भामरागड तालुक्यात दोघेजण रविवारी (८ सप्टेंबर) रोजी बोटीच्या साहाय्याने गुंडेनूर नाला ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात बोट उलटली. तुडूंब भरलेल्या नाल्यातून एकजण कसाबसा बाहेर पडला तर दुसरा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दोन दिवसांनंतर गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी गेले असता, सदर इसम तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर अडकून होता. गावकऱ्यांना पाहून त्याने जोराचा आवाज देताच गावकऱ्याऱ्यांनी धाव घेत रेस्क्यू करत त्याला बाहेर काढले. दलसु अडवे पोदाड़ी असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून त्याने दोन रात्र एक दिवस असे ३६ तास झाडावर काढले. यामुळे लाहेरी परिसरातील नागरिकांना ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.
भामरागड तालुक्यातील लाहेरी पलीकडील बहुतांश गावे पावसाळ्यात संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. लाहेरीवरून ४ किमी अंतरावर गुंडेनूर गाव आहे, त्या पलीकडे अनेक गावे आहेत. लाहेरी आणि गुंडेनूर या दोन गावांच्या मधोमध एक मोठा नाला वाहतो. सदर नाला मोठा असून पावसाळ्यात या नाल्याला नदीचे स्वरूप येत असते. या भागातील आदिवासींना शेतीसाठी खते, जीवनावश्यक वस्तू, आठवडी बाजार तसेच विविध कार्यालयीन कामासाठी लाहेरीला आल्याशिवाय पर्याय उरत नाही. लाहेरीवरूनच पुढील प्रवास सुरू होतो.
दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यातून बोटीच्या साहाय्याने किया नदीत असलेल्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागते. यामुळे आजपर्यंत अनेकांचे जीवही गेले आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र, पावसाळा असल्याने बांधकाम थांबले आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी लाकडी बोटीच्या साहाय्यानेच ये-जा करतात. रविवारी लाहेरी येथील आठवडी बाजार करून सायंकाळच्या सुमारास मुंडेनूर येथील विलास पुंगाटी आणि दलसु पोदाडी हे दोघेजण आपल्या गावाकडे जाण्यासाठी लाकडी बोटीने गुंडेनुर नाला ओलांडत होते, अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, अन् बोट तुडुंब भरलेल्या नाल्यात उलटली. यातून विलास पुंगाटी हा कसेबसे पाण्याच्या प्रवाहातून पोहत पोहत बाहेर पडला. मात्र, दलसु हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
विलासने आपला गुंडेनुर गाव गाठल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला गावातील लोकांना आपबीती सांगितली. मात्र, रविवारपासून या भागात प्रचंड पाऊस असल्याने नदी-नाले तुटुंब भरून वाहत आहेत. दलसू अडवे पोदाडी याचा जीव गेला असणार, असा गावकऱ्यांना वाटत होते. तरीही गावकरी मंगळवारी पावसाने विश्रांती घेताच सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. मुंडेनूर नाल्याजवळ शोधमोहीम राबवित असताना तुडूंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध एक झाडावरून जोराचा आवाज आला. तेंव्हा दलसु हा जिवंत असल्याचे गावकऱ्यांना कळताच त्यातील काही नागरिकांनी परत जात गावातून बचाव साहित्य आणले. तुडुंब भरलेल्या नाल्यातून तब्बल दीड ते दोन तास रेस्क्यू करत त्याला बाहेर काढले.
विशेष म्हणजे रविवार पूर्ण रात्र, सोमवार दिवस आणि रात्र असे तब्बल ३६ तास किरें जंगलातील तुडुंब भरलेल्या नाल्यात दलसु न जेवता, न पाणी पिता झाडावर जिवंत होता. अजूनही या भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. दलसूला तुडुब भरलेल्या नाल्यातून बाहेर काढताना गावकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. त्याला वाचविण्यासाठी अख्ख गाव पाण्यात उतरले होते.