यवतमाळ : आईवर शिवी दिल्याच्या कारणावरून वाद घालून एका तरुणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरुणाचा गळा चिरल्या जाऊन तो गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहेत. ही घटना वणी येथील माळीपुरा परिसरात रविवार, १ डिसेंबर रोजी सकाळी घडली.
प्रणय मुकुंद मुने (२१, रा. माळीपुरा, वणी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी आरोपी अजिंक्य संतोष चौधरी (२४, रा. हिंगणघाट) त्याच्याकडे आला. यावेळी प्रणय घरी एकटाच होता. संभाषणादरम्यान त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामध्ये प्रणयने त्याच्या आईवर शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या अजिंक्यने कंबरेत खोसून असलेला धारदार चाकू काढला आणि प्रणयवर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याचा गळा चिरला जाऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
त्याची आरोळी ऐकून शेजारी राहणारी महिला धावून गेली, रक्तरंजित थरार पाहून तिने प्रणयच्या घराचे दार बाहेरून लावून घेतले. तसेच शेजारील नागरिकांना गोळा केले. त्यानंतर नागरिकांनी दार उघडून आरोपीला ताब्यात घेतले. शिवाय तत्काळ प्रणयला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. घटनेनंतर नागरिकांनी वणी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार ते घटनास्थळी आले. त्यांनी हल्लेखोराला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राणघातक हल्ल्यामागे प्रेम प्रकरणाची चर्चा
हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी केली. तेव्हा आईवर शिवी दिल्याने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली आरोपी अजिंक्यने पोलिसांपुढे दिली. या घटनेमागे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा माळीपुरा परिसरात होती