यवतमाळ : प्रेमसंबंध असल्याचे खोटे सांगत एका माथेफिरू तरुणाने एका अल्पवयीन मुलीची नाहक बदनामी केली. ही घटना उमरखेड तालुक्यातील एका गावात सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
योगेश तोरफडर (२४, रा. विडूळ) असे गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उमरखेड तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी दहावीत असताना योगेश हा तिचा पाठलाग करून बोलत होता. मला तू आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे वारंवार म्हणायचा. मात्र तिने कधीच प्रतिसाद दिला नाही. योगेश हा तिच्यासोबत वारंवार बोलू लागला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी मुलीला समजावून सांगितले. त्यानंतर काही दिवस ती मुलगी त्याच्याशी बोलली.
दरम्यान, मुलीने मार्च २०२४ पासून त्याच्याशी पूर्णतः बोलणे बंद केले होते. त्यानंतरसुद्धा योगेश हा मुलीचा पाठलाग करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. १ ऑगस्टला दारव्हा तालुक्यातील पाहुणे मुलीच्या नातेवाईकांकडे वास्तुशांती कार्यक्रमाकरिता आले होते. त्याचदरम्यान मुलीच्या लग्नाबाबत त्यांनी चर्चा केली. मात्र मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण नसल्याने घरच्यांनी वय पूर्ण झाल्यावर लग्न करणार असे सांगितले. याबाबतची कुणकुण योगेशला लागताच त्याने २३ ऑगस्टला परस्पर त्या पाहुण्यांशी संपर्क साधून माझे त्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहे. तिचे गावातील काही मुलांसोबत प्रेमसंबंध आहे, असे म्हणुन मुलीची नाहक बदनामी केली. अल्पवयीन मुलीचे सर्व ओळखीच्या नातेवाईकांना अशाच प्रकारचे बदनामीकारक मेसेजही पाठविले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांनी उमरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.