कळमेश्वर : कळमेश्वरजवळील सिल्लोरी येथील 20 वर्षीय तरूणाने कळमेश्वर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. उदय संदीप गौरखेडे (वय 20, रा. सिल्लोरी, ता. सावनेर, नागपूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. मात्र, त्याने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
उदय गौरखेडे हा भारत फायनान्स कंपनी नागपूर येथे कामावर होता. कळमेश्वर-कोहळी रेल्वे मार्गावर जिंदल कंपनीच्या मागील बाजूस येणाऱ्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळमेश्वर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणला. कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
दरम्यान, उदय गौरखेडे या 20 वर्षीय तरूणाने आत्महत्या नेमकी का केली, यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास कळमेश्वर पोलिस करत आहेत.