नागपूर : जुन्या उधारीच्या पैशावरून वादाचे पर्यावसन भांडणात झाले. यावेळी मित्राला मारहाण सुरू असताना दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी धावला असता त्याला आरोपींनी बेदम मारहाण केली. डोक्यावर, पोटावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी चारपैकी दोघांना आधीच अटक केली होती. त्यापैकी पसार दोन आरोपींपैकी एकाला अटक केली. अयान कलंदर हुसेन शेख असे आरोपीचे नाव आहे.
कळमना हद्दीतील प्लॉट नं. १४२, नुरी मशिदीजवळ राहणारे दीपक जगदीश सोनी (२४) व त्यांचा मित्र विक्की वर्मा हे दोघे २४ एप्रिल रोजी मध्यरात्री १० ते १२ वाजतादरम्यान भरतनगर चौकात उभे असताना आरोपी आशिष उर्फ भांजा उत्तम पटेल (२०), हिमांशू सुनील चुटले (१९, दोन्ही रा. अभिनव घरकूल योजना, चिखली वस्ती, कळमना), अयान शेख (२०), सुलतान शेख (२२, दोन्ही रा. म्हाडा कॉलनी, चिखली झोपडपट्टी, नागपूर) हे त्यांच्याजवळ आले. यावेळी आरोपी हिमांशु चुटले व इतर आरोपींनी मिळून विक्की वर्मासोबत जुन्या उधारीवरून वाद करणे सुरू केले. यावेळी आरोपी आशिष पटेल, अवाश शेख व सुलतान शेख यांनी विक्कीला हातबुक्कीने मारहाण केली. हा प्रकार पाहून दीपक सोनी मध्यस्थी करून विक्कीला सर्जा बारजवळ घेऊन गेला. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा विक्की आणि दीपकसोबत भांडण सुरू केले. दरम्यान आरोपी अयान शेख याने दीपकच्या डोक्यावर चाकूने वार केला. आरोपी सुलतान शेख याने पोटावर व हातावर चाकू मारून दीपकला ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केले. गंभीर जखमी दीपक सोनीला मेयो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी २६ एप्रिल रोजी दीपक सोनीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
आरोपी आशिष पटेल आणि हिमांशू चुटले यांना अटक केली. इतर आरोपी पसार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे अधिकारी व अंमलदारांना पेट्रोलिंगदरम्यान या गुन्ह्यातील एक आरोपी सीताबर्डी हद्दीतील मीठा नीम दर्गा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अयान कलंदर हुसेन शेख (२१, रा. चिखली वस्ती, कळमना, नागपूर) असे सांगितले. पोलिसांनी गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीचा अभिलेख तपासला असता तो या गुन्ह्यात पसार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिसांनी आरोपीस पुढील तपासासाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), उपायुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनात युनिट क्र. २ च्या महिला पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, साहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चांभारे, पोलीस हवालदार राजेश तिवारी, शैलेश जांभूळकर, हंसराज ठाकूर, नायक पोलीस अंमलदार अर्जुन यादव, कमलेश गणेर, दिनेश डवरे, दीपक चोले, पोलीस अंमलदार सुनील कुंवर व संदीप पांडे यांनी पार पाडली.