नागपूर : शाळा, कॉलेजच्या समोर विनाकारण उभे राहून फ्लॅश मारणारे तरुण किती घातक ठरू शकतात हे सांगणारी ही बातमी आहे. शहरातील एका नामांकित्त कॉलेजसमोर येऊन उभा राहणाऱ्या तरुणाशी अल्पवयीन मुलीची ओळख झाली. त्याने तिला फूस लावून मित्राच्या रूमवर नेले. तिथे तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाहीतर या प्रकाराचा मोबाइल व्हिडीओ काढला. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध स्थापित केले. या प्रकरणी पीडितेने हिंमत दाखवत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. शेख राशीद शेख आसिफ (२०, रा. ताजनगर, टेकानाका, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे.
जरीपटका हद्दीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शहरातील नावाजलेल्या कॉलेमध्ये शिकते तर शेख राशीद हा पेंटिंगचे काम करतो. आरोपी शेख राशीद हा दररोज कॉलेजसमोर फ्लॅश मारत उभा राहायचा. दरम्यान पीडितेची त्याच्यासोबत ओळखी झाली. या माध्यमातून त्यांचे बोलणे सुरू झाले. मोठा व्यवसाय करीत असल्याचे सांगून तिला सुरुवातीला महागड्या भेटवस्तू दिल्या. तिला अनेकदा हॉटेलमध्ये नेले. अशातच आरोपीने तिच्या अल्पवयीन असल्याचा फयदा घेत फूस लावून दुचाकीवर बसवले आणि त्याच्या जरीपटका हद्दीत राहणाऱ्या मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. या ठिकाणी आरोपीने तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध स्थापित केले. याशिवाय त्याने या घटनेचा व्हिडीओदेखील तयार केला.
ही घटना ऑक्टोबर २०२३ ते ४ मे २०२४ दरम्यानची आहे. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणे सुरू केले. पीडिता ही आरोपीच्या धमकीला घाबरली. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून मुलीने सर्व घटनाप्रकार आईला सांगितला. यानंतर आईने आरोपीला समजाविले. परंतु समजण्याऐवजी आरोपीने तिच्या आईला मोबाइलवरून शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांनी थेट जरीपटका पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.