यवतमाळ : यवतमाळचे नायब तहसीलदार गोदाजी राठोड यांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलतो असे सांगून तहसीलदार राठोड यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना यवतमाळच्या महागाव येथे घडली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी 71 हजार रुपयाची वर्गणी दिलेला नंबरवर पाठवा नाहीतर तुमच्या विरोधात असलेला प्रश्न अधिवेशनात लावण्यात येईल, अशी धमकी तहसीलदार गोदाजी राठोड यांना देण्यात आली. या प्रकरणी महागाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, यवतमाळचे नायब तहसीलदार गोदाजी राठोड यांना अशी धमकी देण्यात आली आहे. की, विधानपरिषदेत तुमच्या विरोधात असलेला प्रश्न टाळायचा असेल तर वर्गणी पाठवा, असा फोन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील पाटणकर नावाच्या व्यक्तीचा नायब तहसीलदार राठोड यांना आला. या फोन कॉलवर विश्वास ठेवून नायब तहसीलदार राठोड यांनी 1 जुलै रोजी दुपारी 4.30 च्या दरम्यान मंडळ अधिकारी संजय नरवाडे, किरण मतपलवार यांच्या समक्ष 2 हजार रुपये वर्गणी पाठवली.
याप्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा महागाव तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक शेख गुलाब शेख कासम यांना भ्रमणध्वनीद्वारे 2500 रुपयाची मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार राठोड यांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी नागपूर आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करून या प्रकरणी खात्री केली असता पाटणकर यांनी असा कोणताही कॉल केला नसल्याचे समजले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसताच तहसीलदार गोदाजी राठोड यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.