अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अतिशय पावरफुल्ल आहेत, असे मला वाटले होते. मात्र आता या अर्थसंकल्पानंतर मला माझे विचार चुकीचे वाटायला लागले आहेत. त्यांना डोकं वापरण्याची मुभा नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांच्याही हातात काहीही राहिलेले नाही, असे त्या पुढे म्हणाल्या.
फेलिअर बजेट
केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात केले आहे. शेतकऱ्यांना निव्वळ चुना यात लावलेले आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी कुठेलेही नियोजन यात झालेले नाही. त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेले नाहीये. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आहे तेवढेच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कपाशीचे भाव आज एवढे खाली पडलेली आहे. एवढा कमी भाव याच्या आधी कधीच नव्हता. 2009 मध्ये 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता अवघा चार हजारच्या खाली भावा देत आहे.
अंगणवाडी ताईसाठी या बजेटमध्ये काही नाही, विदर्भासाठी तर काहीच नाही. आज राज्यात आशाताई, आंगणवाडी सेविकांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्यासाठी देखील फार काही या बजेटमध्ये नाही. एकंदरीत सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बजेटमध्ये कुठलीही समाधानकारक बाब नसल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या