सावली (चंद्रपूर) : सध्या काही नकारात्मक गोष्टी घडल्या, पाहिल्या तर प्रामाणिकपणा नाही, असं लगेचच म्हटलं जातं. पण चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे एका प्रकारामुळे प्रामाणिकपणाचे उदाहरण पाहिला मिळाले. तीन तोळे सोने, मोबाईल आणि काही रोख रक्कम असलेली बॅग दोन महिलांना सापडली. पण त्यांनी याचा कोणताही मोह न बाळगता ती प्रामाणिकपणे परत केली.
किर्ती योगेश्वर शेंडे व कुंदा जगदीश लेनगुरे या दोन महिला मूल बसस्थानकावर सावलीच्या बसची वाट पाहत होत्या. तेव्हा त्यांना मौल्यवान वस्तूंची पर्स दिसली. दोन्ही महिलांना पर्स दिसताच त्यांनी आजूबाजूला पर्स कोणाची असल्याची चौकशी केली. मात्र, कोणीही प्रतिसाद दिला नाही. सावलीची बस लागल्याने या दोघेही गावाकडे परतण्यासाठी निघाल्या. वाटेत पर्स उघडली तर त्यात 3 तोळे सोने, मोबाईल व 3500 हजार रोख दिसले.
दरम्यान, या दोन्ही महिलांनी बसमधूनच गावातील माजी सरपंचांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर याची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून संपर्क साधला असता सोनाली गणेश जांपलवार (मु. भेंडाळा ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली) यांची ओळख पटवून पर्स परत केली. या सर्व प्रकारामुळे या दोन्ही महिलांचे विशेष कौतुक केले जात आहे.