विसापूर (चंद्रपूर): पतीला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे घर बर्बाद होऊ लागले. त्यामुळे पती-पत्नीत खटके उडत होते. दोघांमध्ये नेहमी कडाक्याचे भांडण होत होते. नेहमीच्या भांडणाला कंटाळून पत्नीने टोकाचा निर्णय घेतला. धारदार शस्त्राने पतीचा गळा चिरून पतीची निर्घण हत्या केल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. हत्या झालेल्या पतीचे नाव अमोल मंगल पोडे (३८) असे असून, आरोपी पत्नी लक्ष्मी अमोल पोडे (३५) हिला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) पाच हजारांवर लोकसंख्येचे गाव आहे. या गावात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गुरुवारी सकाळी सात वाजता उघडकीस आल्यावर घटनास्थळी गावाकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. मृत अमोल हा पत्नी लक्ष्मी व दोन मुले देवांश (११) आणि सारंग (८) यांच्यासोबत राहत होता. मात्र, अमोलला दारू पिण्याचे व्यसन जडले होते. यामुळे मृतक अमोल पोडे आरोपी लक्ष्मीपडे पती-पत्नीत नेहमीच वाद होत होता. दारूच्या व्यसनावरून पत्नीची व दोन लहान मुलांची आभाळ होत होती. त्यामुळे पत्नी लक्ष्मी त्रस्त होती. नेहमीप्रमाणे बुधवारी अमोल घरी मद्यधुंद अवस्थेत आला. घरी आल्यावर त्याने पत्नीसोबत वाद घातला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तिने सततच्या जाचाला कंटाळून पती अमोलला संपविण्याच्या कट केला. दोन्ही मुले व आई झोपी गेल्याची संधी साधून लक्ष्मीने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, कोंबड्याच्या कातीने अमोलचा गळा चिरून त्याला यमसदनी धाडले. या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना देण्यात आली. विशेष म्हणजे, पतीच्या निघृण हत्येची माहिती स्वतः लक्ष्मीने पोलिसांना दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठ्न घटनेचा पंचनामा केला. अमोलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. या घटनेचा तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.
मुलांचे भविष्य अंधारात
अमोल व लक्ष्मी पोडे यांच्या संसार वेलीवर दोन गोंडस मुले आली. तेच पती-पत्नीचा आधार होती. मात्र, अमोलच्या दारूच्या व्यसनाने सुखी संसार उध्वस्त झाला. अमोल व लक्ष्मीची मुले देवांश व सारंग कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र, अमोलच्या दारूच्या व्यसनामुळे खर्च परवडत नव्हता. त्यामुळे अमोलने सहा दिवसांपूर्वी नांदगाव (पोडे) येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत दोन्ही मुलांचा प्रवेश घेतला. घटनेमुळे दोन्ही शालेय मुलांचे भविष्य अंधारमय झाले आहे.