गडचिरोली : जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेशी वाद घालून तिचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे सोमवारी (२५ नोव्हेंबर) घडली. रूकमा बकय्या दुर्गम (६४) असे हत्या झालेल्या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. तर बापू किष्टया कुम्मरी (३८) असे आरोपीचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता.
बामणी उपपोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ग्लासफोर्डपेठा येथील वृद्ध महिला रूकमा दुर्गम ही घटनेच्या दिवशी गावातील एका महिलेसोबत कपडे धुण्यासाठी गावालगतच्या नदीवर जात होती. दरम्यान, आरोपी बापू कुम्मरी याने गावापासून काही किमी अंतरावर दोन्ही महिलांना गाठले. दुसऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवत पिटाळून लावले. यानंतर वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात वृद्ध महिला जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली.
दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला, मृत वृद्ध महिला रूकमा ही घरी एकटीच राहत होती. तिच्या शेजारी आरोपी बापू कुम्मरी याचे घर आहे. आरोपीला रूकमा जादुटोणा करीत असल्याचा संशय होता. याच संशयातून दोन वर्षांपूर्वी त्याचे रूकमा हिच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर मात्र, वातावरण शांत झाले होते. अशातच दोन दिवसांपूर्वी आरोपी बापूचे वृद्धेशी पुन्हा भांडण झाले होते. यातून सोमवारी आरोपीने वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. आरोपीविरुद्ध बामणी उपपोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बामणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद कुरसंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दांडे करीत आहेत.