नागपूर : कामावरून काढून टाकण्याची धमकी देत पांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने छळवणूकीची तक्रार दाखल केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश धर्मेंद्र भोयर (रुई पांजरी, वर्धा मार्ग) असे आरोपी उपसरपंचाचे नाव आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भोयर हा संबंधित महिलेला वारंवार फोन करून त्रास देत असायचा. रात्री अपरात्री तिच्या घराजवळून जाणुनबुजून फेऱ्या मारायचा. महिला कामावर असताना आरोपी भोयर त्या ठिकाणी जाऊन तिला वाईट पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. ३० जून रोजी संबंधित महिला तिच्या कार्यालयात जेवण करत होती. त्यावेळी भोयर तिच्याजवळ गेला व तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, ५ जुलै रोजी रात्री दीड वाजता भोयरने महिलेच्या पतीला एसएमएस केला. दुसऱ्या दिवशी महिला व पती त्याच्या घरी गेले असता भोयरने दोघांनाही अश्लिल शिवीगाळ करत पुन्हा कामावरून काढण्याची धमकी दिली. महिलेने या त्रासाला कंटाळून अखेर बेलतरोडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी भोयरविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.