मानोरा (वाशीम): येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीने पळवून नेऊन तिचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या पीडित विवाहितेला जबरदस्तीने पळवून नेऊन तिचा छळ करण्यात आल्याची तक्रार दिली आहे. फिर्यादी ही आरोपी गोपाल वाकोडे यास ओळखते. दरम्यान, फिर्यादी बाहेरगावी जात असताना विजय राठोड, लक्ष्मण चव्हाण, मनोहर वाकोडे आणि गोपाल वाकोडे आले. त्यापैकी दोघांनी माझे हातपाय बांधून बेशुद्ध केले. यानंतर मला शुद्ध आली तेव्हा मी एका खासगी बसमध्ये असल्याचे समजले. तेव्हा सोबत गोपाल वाकोडे हा होता.
या प्रकाराबाबत त्याला विचारले असता, त्याने आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आम्ही सूरत येथे गाडीतून उतरलो असता तेथे त्याचे नातेवाईक दीपक ठाकरे, पूजा ठाकरे ऑटोने आले आणि मला त्यांच्या घरी नेले. यानंतर एका मंदिरात जाऊन जबरदस्तीने गोपाल वाकोडे याने माझ्यासोबत विवाह करून वारंवार बळजबरीने अत्याचार केला.
दरम्यान, मला संधी मिळताच तेथून पळ काढून मी गाव गाठले. गोपाल गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय राठोड, लक्ष्मण चव्हाण, मनोहर वाकोडे, गोपाल वाकोडे, दीपक ठाकरे, पूजा ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंद करीत आहेत.