नांदुरा : रेतीची तस्करी करणाऱ्या भरधाव टिप्परने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना जोरदार धडक दिली. यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नांदुरा शहरातील हेलगेनगर भागात बुधवारी (दि. 8) घडली. या घटनेनंतर चालक टिप्पर घेऊन पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध त्याला अटक केली.
सच्चिदानंद नारायण बोचरे (वय 46) व त्यांच्या पत्नी वनिता सच्चिदानंद बोचरे (वय 44) हे दोघे नेहमीप्रमाणे पहाटे मॉर्निंग वॉकला बुलडाणा रोडने गेले होते. सर्व फिरून ते रस्त्याने घरी येण्यासाठी निघाले असता कब्रस्तान ठिकाणाच्या मागील बाजूने रेती घेऊन भरधाव टिप्पर येत होता. याच टिप्परने वनिता बोचरे व सोबत असलेल्या गीता श्रीकृष्ण ढगे यांना धडक दिली. या अपघातात वनिता बोचरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गीताबाई ढगे या जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर टिप्पर चालक गजानन रामदास वसतकार (रा. येरळी) हा टिप्पर घेऊन पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी काही तासांतच त्याला टिप्परसह अटक केली. या प्रकरणी सच्चिदानंद बोचरे यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी गजानन वसतकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.