लाहेरी (गडचिरोली): एकीकडे देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, अनेक गाव खेड्यांना मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात हीच स्थिती असल्याने आदिवासी बांधवांना जिवंतपणीही मरत यातना भोगाव्या लागत आहे. या यातना मरणानंतरही सुटत नसल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी उजेडात आले आहे. थेट मृत्यूनंतरही साधनांअभावी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून तर नदीच्या पात्रातून नावेच्या माध्यमातून मृतदेह वाहून नेण्याची नामुष्की नातेवाईकांवर ओढावली.
भामरागड तालुक्यात नदी, नाल्यावर पुल नसल्याने तुडुंब भरलेल्या नदीतून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाही तर गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह गावकऱ्यांनी चक्क तुडुंब भरलेल्या नदीतून बोटीत टाकून गावात आणला. या घटनेचा विडिओ समोर आला असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
भामरागड तालुक्यांतर्गत येणाऱ्या लाहेरी परिसरातून पामुलगौतम नदीवर पूल नसल्याने गावात रुग्णवाहिका जाऊ न शकल्याने मृतदेह चक्क बोटीत टाकून घेऊन जावा लागला. सविता साधू परसा (वय २८ रा.मेडपल्ली) असे त्या मृतक महिलेचे नाव आहे. सविता ही मागील अनेक दिवसांपासून अज्ञात आजाराने ग्रस्त होती. तिच्या घरच्यांनी उपचारासाठी विविध ठिकाणी वैद्यकीय सल्ला घेतला, मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मागील एक वर्षांपासून सविता ही लाहेरी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहून उपचार घेत होती. अखेर १५ सप्टेंबरला लाहेरी येथे तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी लाहेरीवरून १३ किमी अंतरावर असलेल्या मोरडपार (तिचे माहेर) येथे अंत्यविधी करण्याचे ठरविले.
मात्र, मोरडपारला जाण्यासाठी कच्चा रस्ता व दरम्यान पामुलगौतम नदी आहे. या नदीवर फूल नसल्याने रुग्णवाहिका जाऊ शकत नव्हती. त्यामुळे नातेवाईकानी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मृतदेह नेण्याचे ठरविले. लाहेरीवरून चिखलातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने होड्री, लष्कर आणि गोपणार गाठले. गोपणारनंतर मोरडपारला जाण्यासाठी पामुलगौतम नदी ओलांडल्याशिवाय पर्याय नव्हता.
अखेर सायंकाळी उशिरा येथे असलेल्या बोटीत मृतदेह टाकून तुडुंब भरलेल्या नदीतून त्यांना जीवघेणा जल प्रवास करावा लागला, रात्री उशिरापर्यंत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मोरडपार हे गाव छत्तीसगड सीमेवर असून या भागातील धिरंगी, आलदंडी आदी गावातील नागरिकांना पावसाळ्यात असाच जीवघेणा जलप्रवास करावा लागतो.