नागपूर: माहेरून पैसे आणण्यासाठी वेळोवेळी होणारी शिवीगाळ व मारहाणीपोटी जगणे असह्य झाल्यामुळे विवाहितेने लग्नाला वर्ष होण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरा, नणंद आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वंदना गंभीरजी गाडगे (४५ वर्षे, रा. वॉर्ड क्र. १०, सरस्वती मंगल कार्यालयासमोर, सौंसर, जि. पांढुर्णा, मध्य प्रदेश) यांची मुलगी कंचन नीलेश सोमकुंवर (३३ वर्षे) हिचे १७ डिसेंबर २०२३ रोजी नीलेश सुरेश सोमकुंवर (३५ वर्षे, रा. सौंसर, जि. पांढुर्णा, मध्यप्रदेश) याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर कंचन आणि व तिचा पती नीलेश हे दोघे वंदना गाडगे यांच्या एमआयडीसी हद्दीतील ग्रिनफिल्ड-२, सी. विंग, फ्लॅट नं. ३०८, वागधरा, नागपूर येथील फ्लॅटवर राहायला आले. लग्न झाल्यापासून कंचनला तिचा आरोपी पती नीलेश सोमकुंवर तसेच ती सासरी गेल्यावर तिचा सासरा योगेश सुरेश सोमकुंवर (३८ वर्षे), नणंद प्रीती सुरेश सोमकुंवर वर्षे) व सासू (४० सुरेखा सुरेश सोमकुंवर (५८ वर्षे) हे पैशाची मागणी करीत होते. तसेच या आरोपींनी कंचनला माहेरून पैसे आणण्यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करीत मारहाण करून त्रास देऊन तिचे जगणे असह्य करून आत्महत्येस प्रवृत्त केले.
दरम्यान, या जाचाला कंटाळून कंचनने १२ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री ११ वाजताच्या पूर्वी एमआयडीसी हद्दीतील ग्रिनफिल्ड-२, सी. विंग, फ्लॅट नं. ३०८, वागधरा, नागपूर येथील राहत्या घरी सिलिंग फॅनच्या कडीला दुपट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी वंदना गाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.