नागपूर : पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचे लक्षात येताच पतीने पत्नीच्या डोक्यात वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी २५ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. या दोघांच्या कृत्यामुळे दोन वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे.
मन्नत उर्फ मिनू दिलप्रित कौर विर्क (वय-२४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलप्रित उर्फ विक्की कुलविंदरसिंग विर्क (वय-३०, रा. पंचमवेद्य आर्य सोसायटी, दिक्षीतनगरजवळ, कपिलनगर) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये मन्नत आणि दिलप्रित यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. आरोपी दिलप्रितचे अॅसेसरीज व स्पेअर पार्टचे दुकान आहे. दरम्यान, पत्नी मन्नतचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी दिलप्रितला त्याची मन्नत एका युवकासोबत फिरताना दिसली.
त्यामुळे त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरजानी (वय-२०, रा. हुडको कॉलनी, जरीपटका) याला फोन करून मन्नतसोबत घटस्फोट घ्यायचा आहे असं सांगून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी दिलप्रितचा पत्नीसोबत मंगळवारी रात्री प्रेमसंबंधावरून पुन्हा भांडण झाले.
दिलप्रितने रागाच्या भरात मन्नतच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी दिलप्रित घराला कुलुप लाऊन निघून गेला. दरम्यान, मन्नतचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणीनी मन्नतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांसोबत जाऊन मन्नतच्या घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता मन्नत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आरोपी दिलप्रितविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.