नागपूर : एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोकरी मिळालेल्या पत्नीला पोटगीसाठी अपात्र ठरविले. तसेच या परिस्थितीत पतीची पोटगी देण्याची जबाबदारी संपली, असेही स्पष्ट केले. याप्रकरणी न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
प्रकरणातील पत्नी कौटुंबिक वादामुळे पतीपासून वेगळी राहत आहे. तिच्याकडे आधी उत्पन्नाचा काहीच स्रोत नव्हता आणि पतीनेदेखील तिच्या देखभालीची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे नागपूर कुटुंब न्यायालयाने तिला मे-२०१४ पासून १५ हजार रुपये महिना पोटगी मंजूर केली होती.
दरम्यान, तिला जून-२०२१ मध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे पतीने हायकोर्टात याचिका दाखल करून पत्नीच्या पोटगीला विरोध केला होता. पत्नी कमावती असल्यामुळे स्वतःचे पालनपोषण करू शकते. त्यामुळे आता तिला पोटगी देण्याची गरज नाही, असा दावा त्याने केला होता. त्यानंतर हायकोर्टाने या मुद्यांसह विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता पत्नी केवळ जून-२०२१ पर्यंतच पोटगी मिळण्यासाठी पात्र असल्याचे आणि पती जुलै-२०२१ नंतर तिला पोटगी देण्यास जबाबदार नसल्याचे जाहीर केले.