नागपूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत. धनंजय मुंडेंच्या शागिर्दावर (वाल्मिक कराड) एवढे सगळे आरोप होत असताना आमदार धनंजय मुंडे हे कुठे लपून बसले आहेत ते माहीत नाही. धनंजय मुंडे यांनी समाजासमोर यायला हवं. त्यांच्यावर तोंड न दाखवण्याची वेळ आली असली तरी त्यांनी समाजासमोर यायला हवं, असा हल्लाबोल सत्ताधारी महायुतीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दिलेल्या उत्तरावर मी समाधानी आहे. खडी, जमीन, वाळू आणि खंडणी माफीयांवर आता 302 चा गुन्हा दाखल होणार असून मोक्का अंतर्गत कारवाई देखील होणार आहे. आयजी स्वत:हा तपास करणार असल्यामुळे आम्हाला प्रशासनाची भीती राहिली नाही. त्यामुळे खरे गुन्हेगार समोर येणार आहेत, असंही सुरेश धस म्हणाले.
पुढे म्हणाले, वाल्मिक कराडचे नाव फक्त खंडणीपर्यंत मर्यादित आहे. मात्र, पवनचक्की कंपनीला वाल्मिक कराडने खंडणी मागायला लावली असेल, तसेच नंतर फोन करून संतोष देशमुखचा खून झाला असेल, तर 101 टक्के वाल्मिक कराड मोक्का आणि 302 मधील आरोपी होतील, असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिला आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी सापडले आहेत ते सर्व आरोपी धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्या संपर्कातील आहेत. तसंच कराड याच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात सभागृहात येणारे धनंजय मुंडे हे मागील दोन दिवसांपासून मात्र विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.