यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कारचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भाविकांना देवदर्शनाहून घेऊन निघालेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट झाडावर आदळली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ६ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. आज सोमवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचावकार्य केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातं आहे. अद्याप मृतक आणि जखमी यांची नावे कळू शकलेली नाही. अहमदनगर येथील ८ भाविक रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी माहुर गडावर गेले होते. दर्शन घेऊन पुसद मार्ग ते नगरकडे परतत असताना पुसद-वाशिम महामार्गावरील सत्तरमाळ घाटात कार आली असता, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. या घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना वाशिम आणि पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.