अकोला : राज्यात नेमकं चाललंय काय? बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजेच असताना राज्यात अशा अनके घटना घडताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे कि नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले असतानाच अकोला जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेल्हारा तालुक्यात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वृद्ध व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या एका गावातील १२ वर्षांची मुलगी आपल्या लहान बहिणीला शाळेत सोडून घरी परत जात होती. यावेळी सुखदेव जयराम नळकांडे ही व्यक्ती वाईट हेतू मनात ठेवून तिच्या समोर आली. त्याने तिचा हात पडकडून तिला कवट्यात खेचून घेतले आणि सोबत तिच्यासमोर अश्लिल चाळे सुद्धा केले. हा संपूर्ण घडलेला प्रकार मुलीने आपल्या घरी जाऊन आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई आणि नातेवाईकांनी तेल्हारा पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केली.
पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी सुखदेव नळकांडे या व्यक्तीविरोधात बाल संरक्षण कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ वयोवृद्ध व्यक्तीला अटक केले. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी अकोला जिल्हा कारागृहात करण्यात आली. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेने तेल्हारा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.