Maharashtra Weather : नाशिक : राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पारा कमालीचा घसरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. दिवसंदिवस तापमान खाली येताना पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. राज्यातील वर्षाअखेर पर्यंत असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातही हळूहळू तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशाखाली पोहोचलं आहे. नागरिक गरम कपडे आणि शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमानात मोठी घटट झाली आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगला घसरला आहे.
निफाडमध्ये सोमवारी 8.7 अंश तापमानाची नोंद झाली. रविवार 9.1 अंश तापमान नोंदवले गेले. शनिवारी तापमान 11.2 अंशावर होते. उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीचा गारठा जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी जळगावचे किमान तापमान राज्यात निचांकी राहिले होते. सोमवारी देखील जळगावचे किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगाम तोट्यात आला. पाऊस कमी झाल्याने रब्बी हंगामाबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी चिंता होती. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात थंडीचे प्रमाण चांगले असल्याने या वातावरणाचा लाभ रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारीसह कांदा व इतर पिकांना पोषक ठरणार आहे.