Politics : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. उमेदवार, मतदारसंघ यांची चाचपणी होऊ लागली आहे. आता आपला मुख्यमंत्री व्हावा आणि आपण सत्तेत यावे यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. दोघांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला असून बैठकांवर बैठका, सभा आणि मोर्चेबांधणी सुद्धा सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीच्या एका नेत्याने मोठं वक्तव्य केले आहे. ‘आमचं ठरलंय. सत्ता आमची येणार आणि आमचाच मुख्यमंत्री होणार.’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे विदर्भातील नागपूर आणि वर्धा दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक नेते सुद्धा उपस्थित असणार आहेत. अनिल देशमुख हे देखील शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. शरद पवारांच्या या दौऱ्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी सत्ता आमचीच येणार असल्याचा दावा केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार..
अनिल देशमुख यांनी सांगितले की, ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे सर्वांना माहित आहे. म्हणून इच्छूकांची संख्या वाढली. आमचं ठरलंय. आमची सत्ता येणार. आमचा मुख्यमंत्री होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी एकत्र बसून राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार आहेत.’ तसंच, ‘राज्याची निवडणूक ॲाक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होती. पण भाजप सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते? अजून पुढे ढकलण्याचा त्यांचा विचार दिसत आहे.’ असे वक्तव त्यांनी यावेळी केले.
भाजप सरकार निवडणूक घ्यायला घाबरते…
यावेळी अनिल देशमुख यांनी भाजपवर जरोदर निशाणा साधला. ते म्हणाले कि, ‘भाजप सरकार मनपा, नगर पंचायत निवडणुका घेत नाही आणि आता हे सरकार विधानसभा निवडणूक घ्यायला घाबरतं आहे. मोठा पराभव होणार म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत. अजून किती निवडणुका पुढे जातात हे माहित नाही.’, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.