अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी(यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल आरोपी विनोद चंपतराव भास्करवार (60, श्रीराम अपार्टमेंट, समर्थवाडी, यवतमाळ) यांनी बॅकेत अपहार केल्याप्रकरणी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी विनोद भास्करवार यांचे तर्फे ॲड. निलेश चवरडोल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे कुर्ली शाखा व्यवस्थापक क्रीष्णा खंडेराव कुळकर्णी यांनी 10 ऑक्टोबर 2007 रोजी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद चंपतराव भास्करवार यांनी विश्वासघात करुन बेकायदेशीर रित्या दस्तवेज अनधिकृत पणे खोडतोड केली. अशी फिर्यादी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक कुर्ली शाखेचे व्यवस्थापक क्रीष्णा खंडेराव कुळकर्णी यांनी पारवा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून आरोपी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद भास्करवार यांचे विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सदर प्रकरणाचा तपास करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
रोखपाल विनोद भास्करवार यांनी एकूण 25 कर्जदाराचे कर्ज, कर्ज खात्यात जमा न करता स्वतः हडप करून विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा कुर्लीची फसवणूक केली होती. तसेच बॅकेच्या लेजर मध्ये खोडतोड करुन, तारखा बदलवून ₹ 11,09,353 रुपयांचा अपहार केला व बॅकेतील कर्ज प्रकरण गहाळ केले. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, सदर प्रकरण यवतमाळ येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चाचणी करिता हस्तांतरण करण्यात आले.
सदर प्रकरण पुन्हा घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हस्तांतरण करण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी व फिर्यादी वकीलांनी युक्तिवाद केला. आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद चंपतराव भास्करवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
तसेच आरोपी रोखपाल विनोद भास्करवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 437 – अ मध्ये नमूद प्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीकरिता ₹ 15,000 चे वैयक्तिक बंधपत्र व तितक्याच रकमेचे जामिन पत्र दाखल करण्याचे आदेश दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर यांनी दिले आहे. आरोपी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद भास्करवार यांची बाजू ॲड. निलेश चवरडोल यांनी न्यायालयात मांडली.