गडचिरोली : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना गडचिराली जिल्ह्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात १ मे रोजी सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जात असताना आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली तालुक्यातील बासेंवाडा येथे रात्रीच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. या घटनेत वेगवेगळ्या कुटुंबातील दोघांचा नाहक बळी गेला.
जमनी तेलामी (५२) आणि देऊ आतलामी (६०) अशी मृतांची नावे आहेत. तर अजय बापू तेलामी, भाऊजी शत्रू तेलामी, अमित समा मडावी, मिरवा तेलामी, बापू कंदरू तेलामी, सोमजी कंदरू तेलामी, दिनेश कोलू तेलामी, श्रीहरी बीरजा तेलामी, मधुकर देऊ पोई, अमित उर्फ नागेश रामजी तेलामी, गणेश बाजू हेडो, मधुकर शत्रू तेलामी, देवाजी मुहोंदा तेलामी, दिवाकर देवाज़ी तेलामी, बिरजा तेलामी (सर्व रा. बारसेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) असे आरोपींची नावे आहे.
जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील बासेंवाडा येथील जमनी तेलामी व देऊ आतलामी हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. दरम्यानच्या काळात विविध प्रकारच्या घटना घडल्याने त्यांच्यावर गावकऱ्यांचा संशय अधिक बळावला होता. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अवस्थेत नेत रात्री १० वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील एका नाल्यात पेटवून दिले. या घाणेची माहिती दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत नव्हती. दरम्यान, एटापल्ली पोलिसांना या घटनेची कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला. घटनास्थळी दोघांच्या मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला होता. याप्रकरणी गावातील एकूण १५ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे हे करीत आहेत.