Vidarbha Weather Update : नागपूर : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्यावतीने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील तापमान हे सर्व सामान्य राहणार आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसणार आहे. बहुतांश ठिकाणी थंडीमुळे हुडहुडी भरत असल्याचे चित्र आहे.
शनिवार 20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत विदर्भातील वातावरण कोरडे राहणार आहे. मात्र त्यानंतर 23 जानेवारीला पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पूर्व विदर्भात पावसाचा इशारा
बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरले आहे. परिणामी दक्षिणेकडील भागात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. त्याचा परिणाम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जाणवत असल्याने पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर पुन्हा ढग दाटून येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 23 जानेवारीला तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहे.
रोगांचा वाढता धोका
वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे व्हायरल इन्फेक्शन आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांना त्यांच्या श्वसनसंस्थेत समस्या येत आहेत. तसेच हृदयविकाराच्या झटका येणाच्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
गोंदियात सर्वात कमी तापमानाची नोंद
विदर्भातील थंडीचा जोर ओसणार असल्याचा देखील अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. येत्या 22 जानेवारीपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे सर्वसामान्य असणार आहे. गुरुवारी 20 जानेवारीला विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील कमाल तापमान हे 25 अंश सेल्सिअसच्या वर आहे. आज गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.