अमरावती: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती एकेमकांविरोधात उभे ठाकले आहेत. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा अनेक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीसोबतच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडे लक्ष आहे. अशातच अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना धक्का बसला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या मत विभाजनामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फायदा होऊ नये, यासाठी आपण बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिल्याचे गवई यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोपही यावेळी गवई यांनी केला आहे.
दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारने देखील या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला आहे. तर रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर हे निवडणूक लढवत आहेत. येथे वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, असे असतानाही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने वंचितमध्ये मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे.