यवतमाळ: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने मोठा धक्का बसला आहे. राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातउमेदवार अभिजित राठोड यांच्यासह वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना हा मोठा धक्का बसला आहे.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देश पत्र सादर करण्याची गुरुवार 4 एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची तारीख होती. तर शुक्रवार पाच एप्रिल या नामनिर्देश पत्राची छाननी केली जाणार आहे. दरम्यान यवतमाळच्या नामनिर्देश स्विकृती कक्षात ही प्रक्रिया सुरु असताना वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलला. सुभाष खेमसिंग पवार यांच्या ऐवजी युवा उमेदवार असलेल्या अभिजित राठोड यांना संधी देण्यात आली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभिजित राठोड यांनी आपला उमेदवारी भरला होता.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात महायुतीतून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांची उमेदवारी ही या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याने या मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.