अमरावती : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचारास राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचे पडसाद उमटत आहेत. अशात अमरावतीत व्हॅनचालकाकडून विद्यार्थीनींसमोर अश्लील कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भगतसिंग चौकात शुक्रवारी दुपारी घडली आहे.
आरोपी व्हॅनचालकाचे नाव योगेश असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव रेल्वे येथे एक 15 वर्षीय मुलगी राहते. सध्या ती दहावीत शिकत असून, ती शुक्रवारी धावण्याची स्पर्धा संपल्यानंतर भगतसिंग चौकात बसची वाट पाहत उभी राहिली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा व्हॅन चालक योगेश हा मुलीला म्हणाला की, मॅडम, माझ्या ऑटोमध्ये बसा. त्यावेळी विद्यार्थीनीने मला ऑटोमध्ये बसायचे नाही. त्यावेळी योगेशने विद्यार्थीनीचा पाठलाग करून, तुला काय अडचण आहे, असे म्हणत अश्लील इशारे केले. हा प्रकार पाहून विद्यार्थीनी घाबरुन तत्काळ तिच्या भावाला फोन करून, घटनास्थळी बोलावले.
तसेच घडलेल्या घटनेची सविस्तर तक्रार मुलीने दत्तापूर पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी योगेशविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. याच प्रकरणी चालक योगेशला या मुलीच्या भावाने मारहाण केल्याची तक्रार दत्तापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, एक अल्पवयीन मुलगी ऑटोची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तिला व्हॅनचालकाने गाडीत बसण्यास सांगितले. परंतु, तिने भावाला फोन करून बोलाविले. त्यानंतर दोन जणांनी मारहाण केल्याचा आरोप व्हॅनचालक योगेश याने केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी व्हॅनचालक योगेश नावाच्या तरुणाला अटक केली आहे.