नागपूर : चारच दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. अंगाची हळदही निघाली नव्हती. सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने उराशी बाळगून तो दुचाकीने जात असताना काळाने घाला घातला. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली.
निखिल विद्याधर हर्षे (वय 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. निखिल हा चंद्रभागानगर येथे भाड्याने राहत होता. शनिवारी दुपारी तो काही कामाने दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. जबलपूर ते नागपूर आउटर रिंग रोडने जात असताना टाटा मोटर्सजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निखिल हर्षे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या अपघाताची माहिती हुडकेश्वर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. निखिलच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काम आटोपून लवकर येतो म्हणाला अन्…
लग्नाच्या चौथ्या दिवशी शनिवारी घरमालकाची दुचाकी घेऊन तो काही कामानिमित्त घराबाहेर पडला. तत्पूर्वी पत्नीला ‘काम आटोपून लवकर येतो’, असे सांगितले. पण अपघात झाला आणि सर्व होत्याचे नव्हते झाले.