वर्धा : स्वातंत्र्य दिनानिमित्त कामाला सुट्टी होती म्हणून आठ मित्र वर्धा येथील पवनारच्या धाम नदी पात्रात फिरायला गेले. यापैकी तिघे जण पाण्यात अंघोळीसाठी गेले होते. यातील दोघे पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर सुखरूप बचावला आहे. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा नदीपात्रात शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुमाय खान (वय 21वर्ष ) व नासीर खान(वय 21 वर्ष ) अशी बुडालेल्या दोघांची नावं आहेत. उत्तरप्रदेशमधून वर्ध्यात पीओपीच काम करण्यासाठी काही मजूर आले आहेत. ते वर्ध्यात कारला चौकात सध्या भाड्याच्या खोलीत राहत आहेत. ते पीओचे काम करत होते. आज कामाला सुट्टी असल्याने हे ८ सहकारी पवनारच्या धाम नदी परिसरात फिरायला गेले. यापैकी जुमाय खान, नासीर खान व रेहान खान हे तिघे नदीपात्रात आंघोळीला गेले असता यापैकी जुमाय खान आणि नासिर खान हे पाण्यात बुडाले आहे. ते दोघे नदीपात्रात वाहून गेले तर रेहान खान हा थोडक्यात चावला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी हजर झाले आहे. बुडालेल्या दोघांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी काठावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.