नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.17 डिसेंबर) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मात्र उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे काल नागपुरात दाखल झाले होते. यावेळी ठाकरे गटाच्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. या भेटीवेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते.
दुसरीकडे फडणवीस यांच्या भेटीनंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
याभेटीदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर किंवा शत्रुत्व असे काही नाही. चांगले असेल त्याचे आम्ही समर्थन करू, जे चुकीचे असेल त्यावर टीका करू, असे म्हणाले.