अमरावती : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेसाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ठाकूर फाट्यासमोरील उर्ध्व वर्धा कालव्याजवळ घडला आहे. संदीप देविदास (३९ वय) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. संदीप चौधरी हे २००८ पासून पोलीस दलात कार्यरत होते. सध्या ते चांदुर बाजार पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते.
राज्यात विधानसभा निवडणुकींसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार केला जात असून प्रचारांसाठी नेत्यांची फळी मैदानात उतरवली जात आहे. महायुतीने साधारण ४० पेक्षा जास्त नेत्यांना स्टार प्रचारकाची जबाबदारी दिली आहे. आज भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा अमरावती येथील गुरूकुंज मोझरी येथे होती.
या सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बंदोबस्तसाठी संदीप देविदास हेही तैनात होते. दुपारी योगी आदित्यनाथ यांची सभा संपल्यानंतर ते घरी परतत होते. परतीचा प्रवास करताना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा अपघात झाला. तळेगाव ठाकुर फाट्यासमोर उर्ध्व वर्धा येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अमरावतीहुन गडचिरोली जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीसह संदीप चौधरी यांना एसटी बसने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामधे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.