नागपूर: जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण व चाकूहल्ल्यात गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दोन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. उमेश गंगाधर काळबांडे, असे मृतकाचे नाव आहे.
आरोपी निहाल नरेंद्र शेंडे (२२, रा. हिवरीनगर, नंदनवन, नागपूर) आणि आरोपी नादीर खान अतिक खान पठाण (२७, रा. प्रधानमंत्री आवास योजना, सिम्बॉयसिस कॉलेजजवळ, वाठोडा, नागपूर) यांनी २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.१० वाजताच्या सुमारास उमेश गंगाधर काळबांडे यांना नंदनवन हद्दीतील एलआयजी कॉलनी, लोहाना समाजभवनजवळील अनुवृत्त भवनाच्या मेनगेटजवळ, हिवरीनगर, नंदनवन, नागपूर येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून संगनमत करून शिवीगाळ करत हातबुक्कीने मारहाण केली.
तसेच आरोपी निहाल नरेंद्र शेंडे याने उमेशला ठार मारण्याच्या उद्देशाने पकडून आरोपी नादीर पठाण याने धारदार चाकू ने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी उमेशला उपचाराकरिता न्यू इरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी आकाश गंगाधर काळबांडे (३०, रा. देशपांडे ले-आउट, नंदनवन, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली.
यादरम्यान, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला. ५ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान उमेश काळबांडे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून गुन्ह्याच्या कलमात वाढ करून पुढील तपास सुरू केला आहे.