जिवती (चंद्रपूर): शेतातील विहिरीतील पाणी काढत असताना अचानकपणे पाय घसरल्याने विहिरीत पडलेल्या मामाला वाचविण्याच्या प्रयत्नांत मामासह भाचीचाही मृत्यू झाला. ही घटना १७ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास जिवती तालुक्यातील टाटाकोहाड गावाजवळील शेतशिवारात घडली. शंकर बळीराम गेडाम (५०, रा. टाटाकोहाड) व पूर्वी भानुदास गेडाम (१४, रा. रूंजा टाकळी, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ) अशी मृतकांची नावे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील मृतक पूर्वी गेडाम ही काही दिवसांपूर्वी पाहुणी म्हणून टाटाकोहाड येथे मामाकडे आली होती. दरम्यान, १७ जून रोजी सर्व नातेवाईक शेतात कामासाठी गेले असताना मृतक शंकर गेडाम हे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले. परंतु, पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. त्यांनी आरडाओरड केल्याने मागेच उभी असलेल्या पूर्वी गेडाम हिने त्यांना वाचविण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचाही तोल गेल्याने तीसुद्धा विहिरीत पडली.
दरम्यान, अवंतिका कुळसंगे या दहा वर्षीय बालिकेने आरडाओरड करीत विहिरीत दोर सोडून दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह विहिरीबाहेर काढले. पुढील तपास पाटण पोलीस करीत आहेत.