नागपूर : कारागृहातून सुटका होताच व्यसन भागविण्यासाठी त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चोरीच्या प्रयत्नात असतानाच नागरिकांनी दोघांना पकडून चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. पण यामध्ये त्यांचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
विशाल गायकवाड (वय 24, रा. कैकाडीनगर) आणि विक्की उर्फ सायमन रामटेके (वय 24, रा. रामटेकेनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिघांविरुद्धही गुन्हा नोंदवून फरार आरोपी शुभम याचा शोध सुरू केला आहे. विशाल, विक्की आणि शुभम हे घरफोडीच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची कारागृहातून सुटका झाली. पण व्यसन भागविण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी हुडकेश्वर परिसरात रेकी केली.
मेहरबाबानगर येथील रहिवासी नीलेश तांदुळकर (वय 40) हे सकाळीच्या सुमारास कुटुंबीयांसह समारंभासाठी सासरी गेले होते. ही संधी साधून आरोपींनी दुपारच्या सुमारास मुख्य दाराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा एकूण 1 लाख 43 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
दरम्यान, शेजाऱ्यांना तांदुळकर यांच्या घरातून काही तरी उचल-ठेव होत असल्याचा आवाज आला. त्यांनी तांदुळकर यांना फोन करून घरात कोणीतरी असल्याची माहिती दिली. तोपर्यंत इतर शेजारीही गोळा झाले. त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विशाल आणि विक्कीला पकडले. मात्र, शुभम पळून जाण्यात यशस्वी झाला. नागरिकांनी दोन्ही आरोपींना चांगला चोप दिला आणि हुडकेश्वर पोलिसांना याची माहिती दिली.