नागपूर: मुलीची छेडखानी केल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्याकरिता घरी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आरोपी व त्याच्या वडिलांनी शिवीगाळ करत धमकी दिली. पोलीस आरोपीला ताब्यात घेत असताना त्याच्या अंगावर आरोपीने कुत्रा सोडला आणि दोघेही निघून गेले. या बापलेकाला पोलिसांनी अटक केली आहे. अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी (३७), असे आरोपी मुलाचे, तर पिंटू नंदलालजी बागडी (७३, दोन्ही रा. इतवारी, सराफा मार्केट) असे आरोपी वडिलाचे नाव आहे.
मुलीची छेडखानी केल्याप्रकरणी अंकुशविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तो आला नसल्यामुळे २७ ऑगस्टला रात्री १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान पोलीस हवालदार संजय रामलाल शाहू अंकुशच्या घरी आले. त्यांनी अंकुशला आवाज दिला. अंकुश आवाज ऐकून त्याचा ग्रेडडेन जातीचा पाळीव कुत्रा घेऊन घराबाहेर आला. संजय शाहू यांनी आरोपीला परिचय करून दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार त्याला पोलीस ठाण्यात चलण्यास सांगितले; पण अंकुश बागडी हा त्यांच्याशी उर्मट भाषेत वाद घालत शिवीगाळ करू लागला. आवाज ऐकून अंकुशचे वडील पिंटू बागडी घराबाहेर आले. त्यांनीही संजय शाहू यांना अटकाव करत शिवीगाळ केली.
दरम्यान शाहू यांनी पिंटू बागडी यांना बाजूला केले आणि अंकुशला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता अंकुशने त्याचा पाळीव कुत्रा शाहू यांच्या अंगावर सोडला आणि दोघेही निघून गेले. कुत्र्याने शाहू यांच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. शाहू यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंमलदाराने शाहूंना वाचविण्याकरिता कुत्र्यावर लाठी उगारल्याने कुत्रा पळून गेला. संजय शाहू यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी संजय शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक मादेवार यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपी बापलेकाला अटक केली आहे.