मारेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या महिलेने दोन महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. घरात आनंदाचे वातावरण असतानाच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुभांगी विपुल लालसरे असे मृत महिलेचे नाव आहे. शुभांगीचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. नुकतेच दोन महिन्यांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून ती तणावात राहत असल्याची बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. अशातच मंगळवारी (दि.7) पहाटे तीनच्या सुमारास ती बाळाजवळ नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
त्यानंतर सगळीकडे तिचा शोध सुरु झाला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. संध्याकाळी सहाच्या सुमारास गावातील एका सार्वजनिक विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेने आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.