वणी (यवतमाळ): जुनी वसुली घेऊन शहराकडे परत येत असलेल्या दोघांना रस्त्यात अडवून अज्ञातांनी बेदम मारहाण केली. तसेच ८८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केला. ही घटना तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) मार्गावर १६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेची वणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑटोने किराणा माल पोहोचवून जुनी वसुली घेऊन चालक जितेंद्र रिगोले व सहकारी लक्ष्मण मेश्राम येत होते. तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) रस्त्यावर जनता शाळेच्या समोर दोन दुचाकींवर आलेल्या व्यक्तींनी त्यांचा ऑटो अडविला. तसेच चालकाचा सहकारी लक्ष्मण मेश्राम याला मारहाण केली. यादरम्यान विरोध केला असता अन्य दोघांनी चालक जितेंद्र रिंगोले यांनाही मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील पैशाची बॅग व लक्ष्मण यांचा मोबाइल घेऊन मोटारसायकलवर बसून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी तक्रार वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेत मारहाणस, किराणा मालाची वसुलीचे ८० हजार ७०० रुपये व ८ हजारांचा मोबाइल असा एकूण ८८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेण्यात आला. राजेश रिंगोले यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.