नागपूर : नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला भीषण आग लागली. या आगीत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार 18 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा घराला आग लागली त्यावेळी या लहान मुलांची 7 वर्षांची बहिण घरात होती.
दरम्यान आगीची घटना घडताच ही चिमुरडी घाबरुन घराच्या बाहेर आली. पण ही दोन मुलं मात्र घरातचं अडकली. या घटनेत देवांश उईके वय 7 आणि प्रभास उईके वय 2 या दोन भावांचा मृत्यू झाला. थंडी पासून बचावासाठी शेकोटी पेटवली असता घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
थंडीमुळे हात शेकण्यासाठी घरात शेकोटी पेटवण्यात आली होती, यावेळी घरात तीन मुलं आणि आई होती, मात्र आई काही कामानिमित्त बाहेर गेली आणि अचानक घरामध्ये आग लागली. तर मुलगी घराबाहेर निघाली मात्र मुलं घरातच अडकून पडली, त्यामुळे होरपळून दोघांनाही जीव गमवावा लागला आहे.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बहिणीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. पण तोपर्यंत दोन्ही भावांचा भाजल्याने मृत्यू झाला होता.