नागपूर : उधारीच्या पैशांवरून दोन भावंडांनी मिळून धारदार शस्त्राने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाला. आरोपी भावंडांनी या युवकाच्या पोटावर, मांडीवर तसेच पार्श्वभागावर शस्त्राने वार केले. ही घटना नंदनवन हद्दीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पथकाने दोन्ही आरोपी भावंडांना अटक केली आहे. ताहीर जाकीर खान उर्फ बाबा (२१) व आमीर जाकीर खान (२४, दोन्ही रा. गुलशननगर, कळमना) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी ताहीर जाकीर खान उर्फ बाबा याच्याकडून शेख निसार शेख सगीर (४०, रा. हसनबाग कब्रस्तानजवळ) यांनी काही पैसे उधार घेतले घेतले होते. या उधार घेतलेल्या पैशावरून २१ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते ११.५० वाजताच्या सुमारास नंदनवन हद्दीतील हसनवाग येथील उस्मानिया मशिदीजवळ जावेदभाई ऑइलवाले यांच्या घरासमोर आरोपी ताहीर जाकीर खान उर्फ बाबा याने शेख निसार शेख सगीर याच्याशी वाद घातला. दोघांत वाद वाढल्यानंतर आरोपी ताहीर बाबा आणि त्याचा भाऊ आमीर जाकीर खान शेख याने शेख सगीर यांना मारहाण केली. यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या पार्श्वभागावर तसेच दोन्ही पायांच्या मांडीवर व पोटावर मारून जखमी केले.
जखमीवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ च्या पथकाने माहितीवरून शोध घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची विचारणा केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली.